सावधान! आजपासून पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्राच्या ‘या’ भागांना रेड-ऑरेंज अलर्ट
Maharashtra Monsoon Update
Maharashtra Monsoon Update : राज्यातल्या हवामानानं सध्या ‘संततधार नव्हे, वादळापूर्वीची शांतता’ अशी परिस्थिती निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत ढगाळ हवामान असून, हलक्याफुलक्या सरींची हजेरी आहे. मात्र आता हवामान विभागानं आठवड्याच्या शेवटी मुसळधार पावसाचा तडाखा बसेल असा स्पष्ट इशारा दिलाय. 5 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर अचानक वाढणार असून, कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांना अलर्ट देण्यात आले आहेत.
हे पण वाचा : पेट्रोलपंप मालकाला 1 लिटर पेट्रोलमागे किती कमिशन मिळतं? आकडा ऐकून थक्क व्हाल!
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील नद्या-नाले ओसंडून वाहू लागलेत. मुंबई व उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, पुणे (घाटमाथा), सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर व सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट देत नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
एकीकडे कोकण पाण्यात बुडताना दिसतोय, तर दुसरीकडे मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांना पावसाच्या प्रतीक्षेची चटका लागलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या पण पावसाने पाठ फिरवल्यामुळे तीन लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहेत. विशेषतः सोयाबीनच्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पाऊस लवकर आला नाही तर दुबार पेरणीचं संकट उभं राहील.
हे पण वाचा : हडपसर-यवत, चाकण महामार्ग रुंदीकरणाला गती; तब्बल ६२५० कोटींचा निधी जाहीर!
याच दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा शहराची स्थितीही चिंताजनक आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा शक्कर तलाव पूर्णपणे कोरडा पडल्यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. यामुळे स्थानिकांना पाण्याचे हाल सहन करावे लागत आहेत, शिवाय पर्यटनावरही मोठा परिणाम झालाय. बोटिंगसारख्या सुविधा बंद करण्यात आल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
हवामान खात्यानं 9 जुलैपर्यंत महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
