भारताकडून 336 धावांनी लाजिरवाणा पराभव… तरीही स्टोक्सचा माज काही कमी नाही; म्हणाला…
India vs England Test
India vs England Test : एजबेस्टनच्या मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडला 336 धावांनी धूळ चारत इतिहास रचला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने 58 वर्षांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम देत पहिल्यांदाच या मैदानावर कसोटी सामना जिंकला. विशेष म्हणजे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने हा विजय मिळवला आणि इंग्लंडला अक्षरश: गुडघे टेकायला भाग पाडलं.
हे पण वाचा : राजकारणात मोठा भूकंप करणाऱ्या ‘विजयी मेळाव्या’नंतर राज ठाकरेंनी घेतला धक्कादायक निर्णय!
शुबमन गिलचा या सामन्यातला पराक्रम थक्क करणारा ठरला. पहिल्या डावात 269 आणि दुसऱ्या डावात 161 धावा करून त्याने केवळ कर्णधार म्हणून नव्हे, तर फलंदाज म्हणूनही संघाला पुढे नेलं. आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या वेगवान जोडीने इंग्लिश फलंदाजीची पार गच्छंती केली – दोघांनी मिळून 17 बळी घेतले.
इंग्लंडकडून मात्र अपेक्षित झळाळी कुठेही दिसली नाही. बेन स्टोक्ससारख्या अनुभवी कर्णधारालाही ना फलंदाजीत चमक दाखवता आली ना गोलंदाजीत काही विशेष करता आलं. आणि तरीही पराभवानंतर त्याच्या प्रतिक्रियांत ‘माजोरडेपणा’ दिसून आला.
“भारताचा वेगवान आक्रमण खूप प्रभावी ठरलं, पण मी फार चिंता करत नाही,” असं म्हणत स्टोक्सने आपल्या अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शुबमनच्या बॅटिंगचं कौतुक केलं असलं, तरी संपूर्ण पराभवातून बोध घेण्याऐवजी त्याने तोंडदेखलं गौरव करत स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न केला.
तसेच, “खेळाडू जेव्हा मानसिक व शारीरिकदृष्ट्या थकतात, तेव्हा अशा स्थितींचा सामना करणं कठीण जातं,” असं म्हणत त्याने आपल्या संघाच्या थकव्याचं समर्थन दिलं. स्टोक्सने जेमी स्मिथच्या कामगिरीचं कौतुक केलं – “जेमीने बॅटिंगसह उत्कृष्ट कामगिरी केली आणि ब्रूकसोबत सामन्यात परत येण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही जिंकू शकलो नाही.”
इंग्लंडने शेवटच्या डावात 608 धावांचा पाठलाग करताना केवळ 271 धावांवर गारद होऊन पराभव पत्करला. भारतासाठी हा विजय केवळ एक सामना जिंकण्यापुरता मर्यादित नाही, तर हा एक ऐतिहासिक मोड आहे.
