राजकारणात मोठा भूकंप करणाऱ्या ‘विजयी मेळाव्या’नंतर राज ठाकरेंनी घेतला धक्कादायक निर्णय!
Raj Thackeray
Raj Thackeray : राजकारणात नाट्यमय वळणं अनेकदा पाहायला मिळतात, पण कधी कधी काही क्षण इतिहास घडवतात. असाच इतिहास महाराष्ट्रात पुन्हा एकदा उभा राहिला — ठाकरे बंधू, म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आले. ‘विजयी मेळावा’ या नावाने झालेल्या या ऐतिहासिक सभेने केवळ शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांच्या भावनांना हात घातला नाही, तर राज्याच्या राजकारणालाही नव्या दिशा दाखवल्या.
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्ते मुंबईत गोळा झाले. कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधीच वातावरण उत्साहाने फुलून गेलं होतं. पण खरी खळबळ उडवणारी गोष्ट होती – दोघा भावांचं एकत्र मंचावर येणं, एकमेकांना दिलेलं अलिंगन आणि परस्परांचा ‘सन्माननीय’ असा केलेला उल्लेख. गेल्या दोन दशकांपासून एकमेकांपासून दूर असलेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याचं दृश्य महाराष्ट्रातील जनतेसाठी केवळ भावनिक नव्हे, तर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठरलं.
या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी घेतलेला मोठा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यांनी मनसेच्या प्रवक्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कोणतीही राजकीय प्रतिक्रिया, माध्यमांतील मते किंवा सोशल मीडियावरील वक्तव्यं करण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे बंधनकारक असेल. पक्षात शिस्त राखण्यासाठी आणि अनधिकृत वक्तव्यांमुळे गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं समजतं आहे.
हे पण वाचा : पुण्यातील IT हबमध्ये अंधार! हिंजवडीतील MNC कंपन्या बंद, वाचा नेमकं कारण काय?
सूत्रांच्या माहितीनुसार, या आदेशाचं सर्वांनी स्वागत केलं असून पक्षांतर्गत शिस्तबद्धता आणि एकसंध भूमिका मांडण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून भविष्यात कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींबाबत ठोस आणि एकवाक्य भूमिका अपेक्षित आहे.
