महाराष्ट्रात महापूरसदृश स्थिती? ११ जिल्ह्यांना रेड-हाय अलर्ट जारी, NDRF सज्ज!
Heavy Rain Alert
Heavy Rain Alert : महाराष्ट्रावर निसर्गाचं रौद्र रूप पुन्हा एकदा कोसळलं आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान खात्यानं पुढील २४ तास अतिशय महत्त्वाचे ठरतील, असा इशारा दिला असून, ११ जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तात्काळ प्रतिसादासाठी सज्ज आहेत, तर काही ठिकाणी लष्कराचीही मदत घेतली जाणार आहे.
हे पण वाचा : कर्ज घेताना आगाऊ हप्ते भरलेत? मिळेल आता त्यावरही ‘फायदेशीर’ व्याज; जाणून घ्या
विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील निचऱ्याचे प्रश्न उग्र झाले असून, अनेक परिसर जलमय झाले आहेत. जिल्हाधिकारी विपीन इटकर यांनी नागरिकांना आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन केलं आहे. आतापर्यंत ४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नागपूरसह अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, आणखी पाऊस वाढल्यास लष्कराच्या मदतीची आवश्यकता भासू शकते.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मुंबईसह समुद्रकिनाऱ्यावरील भागांत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असल्याने नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. मच्छीमारांनी देखील खोल समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीचा धोका वाढला आहे. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे भूस्खलन व दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासन अलर्टवर आहे.
हे पण वाचा : शैक्षणिक कर्जासाठी वेटिंग संपलं! सरकारी आदेशानुसार आता १५ दिवसांतच मंजुरी मिळणार
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झाल्याच्या प्राथमिक तक्रारी मिळाल्या आहेत.
