साईभक्तांसाठी गोड बातमी! शिर्डीकडे जाणारा प्रवास आता होणार सुलभ; 239 कोटींचा प्रकल्प मंजूर
Shirdi Railway Project
Shirdi Railway Project : साईभक्तांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा देणारी आणि रेल्वे प्रवास अधिक जलद, सुरक्षित व वेळेत करणारी घडामोड म्हणजे साईनगर शिर्डी-पुणतांबा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी 239.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
हे पण वाचा : जगातील 5 हॉटेल्स जिथे एक रात्र थांबायलाही विकावे लागेल संपूर्ण घरदार
सध्या शिर्डीकडे जाणारा हा मार्ग सिंगल ट्रॅक असल्याने दररोज फारशा गाड्या धावू शकत नाहीत. त्यामुळे वेळेच्या अचूक नियोजनात अडथळे निर्माण होत होते. मात्र आता या मार्गावर दुहेरीकरण झाल्यानंतर अनेक गाड्यांचा प्रवास वेळेत आणि सुरळीत होईल. यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांपासून ते स्थानिक व्यापारी, शेतकरी, विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच मोठा फायदा होणार आहे.
रेल्वेच्या अधिकृत आकडेवारीनुसार सध्या या मार्गाचा वापर केवळ 19.66% इतकाच आहे, परंतु भविष्यात प्रवासी व मालवाहतूक वाढण्याची शक्यता गृहित धरून ताण 79.70% पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हा प्रकल्प केवळ आवश्यकच नाही, तर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतोय. दुहेरीकरणामुळे रेल्वेची वेग, वेळ आणि गुणवत्ता या तीनही पातळ्यांवर सुधारणा होणार आहे.
हे पण वाचा : राज्यात पावसाची शक्यता! तुमचा जिल्हा येलो अलर्टमध्ये आहे का? बघा यादी!
हा संपूर्ण प्रकल्प 2024-25 च्या “अम्ब्रेला वर्क फॉर मल्टी-ट्रॅकिंग” योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचे काम टप्प्याटप्प्याने, नियोजनबद्ध व दर्जेदार पद्धतीने पार पाडले जाणार आहे.
शिर्डी हे धार्मिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून देशातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे याठिकाणी देशभरातून लाखो भक्त नियमितपणे गर्दी करतात. परंतु रेल्वे मार्गाची सध्याची परिस्थिती अपुरी असल्यामुळे या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दुहेरीकरण झाल्यानंतर ही स्थिती बदलणार आहे.
या प्रकल्पाचा फायदा केवळ शिर्डीपुरता मर्यादित राहणार नाही. याचा सकारात्मक परिणाम ग्रामीण भागातील शेतीमाल वाहतूक, उद्योगधंदे, पर्यटन व स्थानिक रोजगारावर देखील होणार आहे.
