पालक-विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ कारणामुळे 8 आणि 9 जुलै रोजी सर्व शाळा बंद राहणार
Maharashtra School Strike
Maharashtra School Strike : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बातमी आहे. ८ आणि ९ जुलै रोजी महाराष्ट्रातील बहुसंख्य शाळांचे दरवाजे बंद राहणार आहेत. अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली मागणी सरकारकडे पोहोचवण्यासाठी दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवस शाळा बंद राहणार असल्याची निश्चिती आहे.
हे पण वाचा : पुण्यासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा धोका; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी
राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदान व सेवा लाभांबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली अनागोंदी हे या आंदोलनामागचे मुख्य कारण आहे. शिक्षक संघटनांचा आरोप आहे की सरकारने वारंवार आश्वासनं दिली, बैठकाही घेतल्या, पण अद्याप कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.
गेल्या वर्षी १ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झालेल्या ७५ दिवसांच्या आंदोलनानंतर सरकारने १४ ऑक्टोबरला जीआर जारी करून काही निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्ष निधी वितरणाचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. त्यामुळे सरकारवर पुन्हा दबाव आणण्यासाठी शिक्षकांनी हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
८ व ९ जुलै रोजी राज्यभरातील हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत. या निदर्शनात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना, संयुक्त मुख्याध्यापक संघटना आणि इतर शिक्षक संघटनांचा सक्रिय सहभाग आहे. हे आंदोलन फक्त वेतनवाढीसाठी नसून, सेवाशर्ती, स्थायिकरण, सेवानिवृत्ती लाभ, व प्रतिक्षा यादीतील अनुदानवाढ यांसारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न आहे.
हे पण वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात वाढ होणार; केंद्र सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
या आंदोलनामुळे दोन दिवस राज्यातील अनेक शाळांमधील अध्यापन कार्य ठप्प होणार असून ग्रामीण भागात याचा अधिक तीव्र परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या युगात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणे ही खेदाची बाब मानली जात आहे, मात्र शिक्षकही आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास भाग पाडले गेले असल्याचे त्यांच्या संघटनांचे म्हणणे आहे.
