नवी मुंबई ते कल्याण प्रवास आता १५ मिनिटांत होणार! नवीन उन्नत रस्त्याने ट्रॅफिकचा त्रास संपणार
Elevated Link Road
Elevated Link Road : नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमधील लाखो रहिवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ठाणे जिल्ह्यातील सततच्या वाहतूक कोंडीला आता सुटका मिळणार आहे. कारण कटाई नाक्यापासून थेट राष्ट्रीय महामार्ग-४ (NH-4) ला जोडणारा ६.७१ किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यासाठी वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.
हे पण वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! मासिक पगार ₹45,000; पुण्यात मेगाभरती जाहीर
या प्रकल्पामुळे नवी मुंबई ते कल्याण हा प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ आणि वेगवान होणार आहे. आजवर शिळफाटा, महापे मार्गे वळसा घालून जाणाऱ्या वाहनचालकांना थेट आणि सुकर मार्ग मिळणार असून, वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होणार आहे.
एमएमआरडीएने आधीच १९८२ कोटी रुपयांचे कंत्राट अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या नामांकित कंपनीला दिले आहे. हा सहा पदरी उन्नत मार्ग केवळ ट्रॅफिक कमी करणार नाही, तर संपूर्ण प्रादेशिक विकासाला नवे वळण देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेषतः अंबरनाथ, बदलापूर परिसरात प्रचंड वेगाने होणाऱ्या नागरी विस्तारामुळे वाहतुकीवरील ताण दिवसेंदिवस वाढतो आहे.
हा रस्ता कटाई नाक्याला कल्याण-शील रोडवरील टोल नाक्याजवळून थेट मुंबई-पुणे महामार्गाशी (NH-4) जोडणार आहे. मात्र, या मार्गासाठी सुमारे ०.८३२५ हेक्टर खारफुटीची जागा वळवावी लागणार असल्याने एमएमआरडीएने यासाठी पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे.
या कॉरिडॉरमध्ये ६ किमीचा व्हायाडक्ट, १०० मीटरचा रेल्वे ओव्हरब्रिज (भारतीय रेल्वे व DFCCIL मार्गावर), १.५८ किमीचा रॅम्प आणि ६.३२ किमीचे सेवा रस्ते प्रस्तावित आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प हा एकात्मिक आणि भविष्यातील वाढत्या गरजांना पुरून उरणारा ठरणार आहे.
दरम्यान, एमएमआरडीएने प्रस्तावात स्पष्ट नमूद केले आहे की, शहरांच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे विद्यमान पायाभूत सुविधा ताणात आल्या आहेत. विशेषतः गर्दीच्या वेळी वाहतुकीची कोंडी केवळ नागरीकांचाच वेळ वाया घालवत नाही, तर व्यापार, दळणवळण आणि आपत्कालीन सेवा यांच्यावरही विपरित परिणाम होत आहे.
