कोकण ते आंबा घाट प्रवास वेगवान, पण कोल्हापूर जिल्ह्यात टोलचे संकट; ‘या’ ४९ गावांना टोलमुळे बसणार मोठा फटका
Nagpur Ratnagiri Highway
Nagpur Ratnagiri Highway : नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाचे काम जोरात सुरू असून, कोकणातून आंबा घाटापर्यंतचा टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे कोकणातून वाहनांची आंब्यापर्यंत ये-जा पूर्वीपेक्षा खूपच सुलभ झाली आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यात मात्र हा महामार्ग अजूनही गती घेताना दिसत नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यात दोन ठिकाणी टोल वसुलीच्या हालचालींना सुरुवात झाली असून, टोलसाठी स्थळेही निश्चित झाली आहेत.
हे पण वाचा : हवामान विभागाकडून सर्वात मोठी बातमी! राज्याच्या ‘या’ भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
नागपूर-रत्नागिरी महामार्ग (क्रमांक १६६) हे महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम दळणवळणासाठी महत्त्वाचे दुवा बनत आहे. १३४ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम २०२३ मध्ये सुरू झाले होते. रत्नागिरीतील मिऱ्या बंदर ते आंबा घाटापर्यंतचा पहिला टप्पा आता जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून येणारी वाहने आंबापर्यंत सुसाट धावत आहेत. मात्र, चोकाकपासून पुढे कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत कामाचा वेग कमी आहे. डोंगराळ भाग, मुसळधार पाऊस आणि अजस्त्र पूलांचे बांधकाम यामुळे अडथळे येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
या महामार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सांगली-कोल्हापूर मार्गदेखील यामध्ये समाविष्ट झाला आहे. पूर्वी बीओटी पद्धतीने या रस्त्याचे काम खासगी कंपनीकडे होते. मात्र, कोल्हापूर शहरात टोल विरोधातील आंदोलनामुळे हे काम थांबले. परिणामी, या प्रकल्पाचे अधिकार महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले. आता नव्याने निधी मंजूर झाला असून, पावसाळ्यानंतर काम सुरू होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात टोल नाक्यांसाठी दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे – पन्हाळा तालुक्यातील आवळी आणि हातकणंगले तालुक्यातील शिरोली-बसवनखिंड. या टोलनाक्यांची रचना पूर्ण रस्त्याचे काम झाल्यानंतर सुरू केली जाणार असून, ठेकेदार कंपनीला २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ४९ गावे बाधित होणार असून, १२,६०८ शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली आहे. यामध्ये आंबा ते पैजारवाडी (४५.२० किमी) आणि पैजारवाडी ते चोकाक (३२.९६ किमी) असे दोन मुख्य टप्पे आहेत. संपूर्ण रस्ता ४५ मीटर रुंदीचा असून, यासाठी ५,६९८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
