रेल्वेत तब्बल 1 लाख जागांसाठी मेगाभरती! तरुणांनो सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली; वाचा अर्ज कसा करावा?
Railway Recruitment 2025
Railway Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो तरुणांसाठी भारतीय रेल्वेकडून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने तब्बल 1 लाख नव्या पदांसाठी मेगाभरतीची घोषणा केली असून ही भरती दोन टप्प्यांमध्ये – 2025-26 आणि 2026-27 या आर्थिक वर्षांमध्ये पार पडणार आहे. रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या असंख्य उमेदवारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
हे पण वाचा : धक्कादायक बातमी! कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार; खलिस्तानी दहशतवाद्याचा कट?
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, प्रत्येक वर्षी जवळपास 50,000 पदांची भरती करण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध विभागांमध्ये ग्रुप D, NTPC, JE (Junior Engineer), ALP (Assistant Loco Pilot) अशा पदांसाठी भरती केली जाईल. त्यामुळे शालेय, पदवीधर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी चांगली संधी मिळणार आहे.
मागील काही महिन्यांत रेल्वे भरती मंडळाकडून (RRB) भरती प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत 7 अधिसूचना जारी करून 55,000 हून अधिक पदांसाठी संगणक आधारित परीक्षा (CBT) घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये तब्बल 1.86 कोटी उमेदवारांनी सहभाग नोंदवला आहे. यावरून स्पर्धेची तीव्रता आणि या क्षेत्रातील आकर्षण स्पष्ट होते.
2025-26 या आर्थिक वर्षात पहिल्याच तिमाहीत 9000 उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली गेली आहेत. ही संख्या पाहता रेल्वे मंत्रालय आपली रिक्त पदे भरून देशभरातील तरुणांना नोकरीच्या संधी देण्यास कटिबद्ध आहे. परीक्षेची पारदर्शकता, गती आणि गुणवत्ता यावर रेल्वे भरती मंडळ खास भर देत आहे.
या मेगाभरतीमुळे केवळ रोजगारच उपलब्ध होणार नाही, तर अनेक कुटुंबांचे जीवनमानही उंचावेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून ते शहरातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असलेल्या उमेदवारांपर्यंत, सर्वांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
