टी20 मालिकेसाठी श्रीलंका संघ जाहीर, ईशान मलिंगाला पहिल्यांदाच संधी! पाहा तारीखा व ठिकाणं
T20i Series
T20i Series : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामना पुन्हा एकदा चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. कसोटी आणि वनडे मालिकेनंतर आता दोन्ही संघ टी-20 मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. 10 जुलैपासून सुरू होणाऱ्या या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 17 सदस्यीय संघ जाहीर केला असून, काही नव्या चेहऱ्यांचा समावेश तर काही अनुभवी खेळाडूंची पुनरागमनाने रंगत आणली आहे.
या मालिकेचं खास आकर्षण ठरत आहे ईशान मलिंगा. पहिल्यांदाच त्याची टी-20 संघात निवड झाली आहे. ईशानने आतापर्यंत 6 एकदिवसीय सामने खेळले असले, तरी ही त्याची टी-20 आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिली संधी ठरण्याची शक्यता आहे. त्याच्या निवडीने अनेक चाहत्यांचे लक्ष या मालिकेकडे वळले आहे.
श्रीलंकेकडून या मालिकेत नेतृत्वाची धुरा युवा आणि दमदार फलंदाज चरिथ असलंका याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी कर्णधार दासुन शनाका तब्बल वर्षभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा संघात परतला आहे. शनाकाचा शेवटचा सामना जुलै 2024 मध्ये होता. त्याच्यासह अष्टपैलू खेळाडू चमिका करुणारत्ने याचंही संघात पुनरागमन झालं आहे.
या वेळी भानुका राजपक्षेला मात्र संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भानुकाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने दोन सामन्यांत फक्त 14 धावा केल्या होत्या, ज्यामुळे निवड समितीनं त्याच्यावर विश्वास न दाखवण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या बाजूला बांगलादेशने देखील लवकरच संघ जाहीर केला असून, लिटन कुमार दास याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी आहे. बांगलादेशने 16 सदस्यीय संघ तयार केला असून, वनडे मालिका संपल्यानंतर त्यांचा पूर्ण फोकस टी-20 मालिकेकडे असणार आहे.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक :
पहिला सामना: 10 जुलै, पल्लेकेले
दुसरा सामना: 13 जुलै, दांबुला
तिसरा सामना: 16 जुलै, कोलंबो
श्रीलंकेच्या या संघात पथुम निसांका, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, वानिंदु हसरंगा, महेश तीक्ष्णा, मथीशा पथिराना यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे हा संघ अनुभव आणि युवा ताकदीचं संतुलन साधणारा आहे.
